अलिबाग ः प्रतिनिधी
कोरोना प्रादुर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात 8 ते 14 ऑक्टोबरदरम्यान मिशन कवच कुंडल नावाने विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. त्याचप्रमाणे नवरात्री विशेष म्हणून महिलांसाठी 11 ऑक्टबर रोजी विशेष लसीकरण होणार आहे. जिल्ह्यात विशेष कोरोना लसीकरण मोहिमेसाठी नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येक गावाच्या लोकसंख्येनुसार तसेच शिल्लक राहिलेल्या लाभार्थींच्या संख्येनुसार प्रत्येक दिवशी लसीकरण सत्र आयोजित करण्याची सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक गावासाठी टीम निश्चित करून लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. एका गावाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दुसर्या गावाचे लसीकरण ही टीम करेल अशा प्रकारे संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या डोसचे प्राधान्याने आणि दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थीचे लसीकरण करण्यात येणार आहे.