मुंबई ः प्रतिनिधी
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी गुरुवारी (दि. 7) जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील आधीच्या नावांसोबतच नव्या काही नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 80 सदस्यांची नावे असणारी यादी जाहीर केली. यामध्ये विशेष निमंत्रित म्हणून आमदार आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार आणि लड्डाराम नागवानी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे, चित्रा वाघ यांना कार्यकारिणीत सदस्य म्हणून संधी देण्यात आली आहे. याशिवाय पदाधिकारी म्हणून विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्याक मोर्चा), देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांची नावे कायम आहेत.
अडवाणी, जोशींचाही समावेश
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. पंतप्रधानांनंतर दुसरे नाव पक्षाचे सर्वांत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे, तर त्यांच्यापाठोपाठ तिसरे नाव मुरली मनोहर जोशी यांचे आहे. त्यामुळे आता हे दोन्ही नेते पक्षाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.