मुंबई ः प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याची चिन्ह दिसत असल्याने क्रीडा संघटनाही जागृत होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच राज्य शासनाची क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत नियमावली जाहीर होणार आहे. या अनुषंगाने सर्व संलग्न कबड्डी जिल्हा असोसिएशनचे सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये समन्वय साधण्याच्या व विचारविनिमय करण्याच्या दृष्टीने मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 23 व 24 ऑक्टोबर रोजी अलिबाग येथे होणार आहे. या शिबिरात सर्व गटांच्या राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजन, कुमार व किशोर गटाच्या जन्मतारखेबाबत एकवाक्यता, राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करणार्या संस्थाच्या अडचणीवर चर्चा व त्यांच्याकरिता मार्गदर्शक सूचना, पंचांना येणार्या अडचणीवर चर्चा व पंच शिबिर आयोजन, राज्य पंच परीक्षेबाबत चर्चा, ग्रामीण भागातील उदयोन्मुख युवकांना कबड्डीकडे आकर्षित करण्याकरिता व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने योजना आखणे त्याचबरोबर शासनाचे क्रीडा धोरण आदी विषयावर चर्चा होईल. सर्व संलग्न जिल्हा असोसिएशनच्या सचिवांनी 23 ऑक्टोबर रोजी आपली उपस्थिती शिबिरास्थळी राखावी. त्याचबरोबर आपण येणार असल्याची आगाऊ सूचना शिबिर प्रमुख जे. जे. पाटील (9822427102) यांना कळवावी. आपण आपल्या सूचना व अडचणींबाबत लेखी स्वरूपात कळविल्यास चर्चा करण्यास अधिक वेळ उपलब्ध होईल, असे एका पत्रकाद्वारे राज्य संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.