दुबई ः वृत्तसंस्था
इंग्लंडच्या आदिल रशीद (4/2) आणि मोईन अली (2/17) या फिरकीपटूंच्या जोडीपुढे गतविजेत्या वेस्ट इंडिजच्या नामांकित फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकातील सुपर 12 फेरीच्या सामन्यात इंग्लंडने विंडीजचा सहा गडी आणि 70 चेंडू राखून फडशा पाडला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 56 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचीसुद्धा एकवेळ 4 बाद 39 धावा अशी तारांबळ उडाली होती, परंतु जोस बटलरने (नाबाद 24 धावा) कर्णधार ईऑन मॉर्गनच्या (नाबाद 7) साथीने 8.2 षटकांत संघाचा विजय साकारला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना विंडीजने आक्रमकतेच्या नादात एकामागून एक बळी गमावले. ख्रिस गेलव्यतिरिक्त (13) त्यांच्या एकाही फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. अलीने लेंडल सिमन्स (3) आणि शिम्रॉन हेटमायर (9) यांचे बळी मिळवले, तर रशीदने धोकादायक किरॉन पोलार्ड (6) आणि आंद्रे रसेल (0) यांच्यासह आणखी दोघांना माघारी पाठवून विंडीजचा डाव अवघ्या 14.2 षटकांत 55 धावांत गुंडाळला. सर्व बाद 55 ही वेस्ट इंडिजची ट्वेन्टी-20मधील दुसर्या क्रमांकाची नीचांकी धावसंख्या ठरली. 2019मध्ये इंग्लंडविरुद्धच त्यांचा 45 धावांत खुर्दा उडाला होता. संक्षिप्त धावफलक – वेस्ट इंडिज : 14.2 षटकांत सर्व बाद 55 (ख्रिस गेल 13; आदिल रशील 4/2, मोईन अली 2/17) पराभूत वि. इंग्लंड : 8.2 षटकांत 4 बाद 56 (जोस बटलर नाबाद 24, जेसन रॉय 11; अकील होसेन 2/24). सामनावीर : मोईन अली.