Breaking News

सभा आणि शोभा!

तापमानाचा पारा वर चढत असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचारही चांगलाच तापू लागला आहे. त्यातून राजकीय धुरळा उडत असून, आरोप-प्रत्यारोपाचा डाव ऐन रंगात आला आहे. अशा वेळी सर्वच पक्षांचे नेते जोरदार भाषण देत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये काहींना उत्तम प्रतिसाद लाभतोय, तर काहींची मात्र पुरती दमछाक होताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय नुकताच आला.

सभा मग ती कोणतीही असो वक्ता अभ्यासू असणे आवश्यक असते. राजकीय सभा गाजविण्यासाठी तर अष्टावधानी असावे लागते. अशा नेत्याला मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे त्याचा पक्ष, पूर्वइतिहासही पाहिला जातो. त्यावरून त्याचा ‘टीआरपी’ ठरतो. हल्ली महाराष्ट्रात मोजकेच नेते सभा गाजविताना दिसत आहेत. त्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. दिवसाला साधारणत: तीन सभा घेत त्यांनी महायुतीच्या प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा मंगळवारी कामोठे येथे झाली. व्यस्त वेळापत्रकामुळे या सभेत मुख्यमंत्री काही मिनिटेच बोलले, पण ज्या आक्रमक अंदाजात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला त्यामुळे कार्यकर्ते उत्साहित झाले नसते तरच नवल. ही सभा ज्या नालंदा बौद्धविहार मैदानात झाली, त्या मैदानात सभास्थानी असलेल्या सर्व खुर्च्या माणसांनी भरून गेल्या होत्या. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना उभे राहावे लागले. मुख्यमंत्री वेगवेगळ्या निवडणुकांच्या निमित्ताने याआधीही पनवेल परिसरात येऊन गेले आहेत, परंतु त्यांची के्रझ आजही कायम आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांनी बारामतीचे पार्सल परत पाठवा अशा नेमक्या शब्दांत विरोधकांवर हल्लाबोल करीत मतदारांचे लक्ष वेधले. सरकारी योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कणखर नेतृत्व यावरही त्यांनी जोर दिला. त्याचवेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेतील सुयोग्य कारभार याचेही कौतुक करायला ते विसरले नाहीत. मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर काही वेळात कामोठ्याजवळील खारघर वसाहतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. या सभेचा अक्षरश: फज्जा उडाला. मूळात पवारांची लोकप्रियता कमी होत चालली आहे. त्यातच सत्ताधार्‍यांविरोधात ठोस मुद्दा नसल्याने विरोधकांच्या प्रचाराची दिशा भरकटली आहे. काँग्रेसकडून कुणीही प्रभावीपणे बोलणारा नेता नाहीए. त्यामुळे पवार एकट्यानेच आपल्या परीने खिंड लढवित आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी खारघरमध्ये सभा घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खुद्द शरद पवारही उत्सुक होते, मात्र सभेला लोक कमी आणि रिकाम्या खुर्च्या अधिक दिसून आल्या. त्यामुळे पवार साहेब महाआघाडीतील खासकरून शेकाप व काँग्रेसच्या नेत्यांवर नाराज झाले असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा दणदणीत झाली असताना दुसरीकडे शरद पवारांच्या सभेला अपेक्षित लोक जमले नाहीत. साहजिकच पवारांच्या व मुख्यमंत्र्यांच्या सभेची तुलना झाली. मुख्यमंत्र्यांची सभा जबरदस्त झाली. त्याचा फायदा श्रीरंग बारणे यांना होईल, तर पवारांच्या सभेची शोभा झाल्याने पार्थ यांचे भवितव्य अवघड दिसते.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply