अलिबाग : प्रतिनिधी
दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे यांच्या ’उनाडक्या’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. 30) सरस्वती एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त अशोक टिळक आणि मनीषा टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या सभागृहात अॅड. संजीव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला प्रकाशक फारूक नाईकवाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमर वार्डे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील घटनांचे संदर्भ जोडत गेल्यास त्या घटनांचा आनंद लुटता येईल, असे प्रतिपादन अॅड. जोशी म्हणाले. एखाद्या देशावर हल्ला करायचा असेल तर त्या देशावर सैन्य घेऊन आक्रमण करण्यापेक्षा तेथील शिक्षण व्यवस्थेवर घाव घातला जातो. सध्या आपल्या देशात हेच सुरु आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेवरचे हल्ले रोखले नाहीत. तर अधोगती अटळ आहे. त्यामुळे देशाचा शैक्षणिक दर्जा उचावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत अमर वार्डे यांनी या वेळी व्यक्त केले. अलिबाग हा डाव्या विचारांचा वारसा सांगणार्या पक्षाचा बालेकिल्ला. त्या पक्षाला आज मार्क्सवादाचा विसर पडला आहे. त्यांचे वर्तन हे भांडवलशाहीला धार्जिणे होत चालले आहे. या पक्षाला हळदीकुंकू समारंभ, माघी गणेशोत्सव समारंभांचे आयोजन करण्यात धन्यता मानवी लागत आहे, अशी टीका वार्डे यांनी या वेळी केली. अॅड. संजय आचार्य यांनी प्रास्ताविक केले. अशोक टिळक, मनिषा टिळक, फारूक नाईकवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कांचन नागे यांनी सूत्रसंचालन केले. योगेश मगर यांनी आभार मानले.