कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
शहरातील मुद्रे येथील रेव्हेन्यू कॉलनीमधील घरफोडी प्रकरणी कर्जत पोलिसांनी आरोपींना मुद्देमलासह ताब्यात घेतले. कर्जत मुद्रे येथील रेव्हेन्यु कॉलनीमध्ये, राहणारे रंजित धोंडीबा चव्हाण आणि त्यांचे कुटुंब घरी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने 13 ऑक्टोबर रोजी घरफोडी करून त्यांच्या फ्लॅटमधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व मोबाइल असा एकूण एक लाख 44 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कर्जत पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने चोरीस गेलेला मोबाइलच्या मदतीने गुह्यातील मुख्य आरोपी शफीक अब्दुल शेख (वय 40, रा. भिवंडी, जि. ठाणे) याला भिवंडी येथून ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली व चोरलेले सोन्याचे दागिने सोनाराकडे विकण्यासाठी लवकुश पापाजी गुप्ता (वय 31, रा. अंबरनाथ) याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लवकुश यास अंबरनाथ येथून ताब्यात घेऊन विकण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने सोनाराकडून जप्त केले. आरोपी शफीक अब्दुल शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रबाळे, भिवंडी, ठाणे या पोलीस ठाण्यात एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी लवकुश पापाजी गुप्ता यांच्यावरही चोरीचा गुन्हा दाखल आहे. हे दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील उपनिरीक्षक महेश धोंडे, हवालदार सुभाष पाटील, स्वप्निल येरुणकर, अंमलदार भुषण चौधरी, गणेश पाटील, अश्रुबा बेद्रे यांनी या गुन्ह्याची उकल केली.