कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील डिकसळ गावात रस्त्याच्या मधोमध विद्युत वाहिन्या धोकादायक झाल्या आहेत, याकडे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने येथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये विजेचा लंपडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा जवळ आल्याने विज वितरण कंपनीने विजेच्या तारा, ट्रान्सफॉर्मर नव्याने टाकले आहेत. मात्र काही ठिकाणचे सडलेले विजेचे पोल बदलण्यात आले नाहीत. तर अनेक डिपी उघड्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. विजेच्या सततच्या हुलकावणीने संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन अनेकवेळा संबंधित अधिकार्यांना वारंवार कळविले आहे, निवेदन दिले आहे. पण त्यांच्यात काहीच फरक पडत नसल्याचा आरोप किशोर गायकवाड यांनी केला आहे. विज वारंवार खंडित होत असल्यामुळे अनेक बँक व्यवहार ठप्प होत असून, अनेकांचे व्यवहार थांबत आहे. त्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वीज गेली तर, रात्र जागूनच काढावी लागत आहे, ही परिस्थिती सातत्याने उद्भवत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गंजलेले पोल त्वरित बदलण्यात यावेत, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा किशोर गायकवाड यांनी दिला आहे.