Breaking News

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना

पंतप्रधानांच्या हस्ते गरीब  कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घराच्या जवळच काम मिळावे. आतापर्यंत तुम्ही तुमचे कौशल्य व श्रमाने शहरांना झळाळी देत होतात, पण तेच काम आता गावांसाठी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) गरीब स्थलांतरित मजुरांसाठी 50 हजार कोटी रुपयांच्या रोजगार गॅरंटी योजनेला सुरुवात झाली. त्या वेळी ते बोलत होते.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी गरीब कल्याण रोजगार अभियानाचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत कार्यकुशलतेच्या आधारावरच मजुरांना कामाचे वाटप होणार आहे. बिहारमधील खगरिया येथून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, या वेळी पंतप्रधान मोदी यांनी स्थानिकांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अभियानाचा प्रारंभ करताना ग्रामस्थांशी संवाद साधल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर अडकलेल्यांना मदत पोहचवण्याचे काम आम्ही केले. घरी परतणार्‍या मजुरांसाठी रेल्वे सुरू केली. कोरोनाचे संकट इतके मोठे आहे की संपूर्ण जग हादरले, पण भारतीय खंबीरपणे उभे राहिले. ग्रामीण भारताने कोरोनाचे संक्रमण प्रभावीपणे रोखले आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या संपूर्ण युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. आपण जे केले तितके काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम जरी पाश्चिमात्य देशात झाले असते तर प्रचंड कौतुक
झाले असते. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत, पण मी तुमचा जयजयकार करीत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणार्‍यांना मी नमन करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
सहा राज्यांवर लक्ष केंद्रित
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्च ते 31 मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला होता. यादरम्यान लाखो स्थलांतरित मजूर शहरांमधून आपापल्या गावी परतले, परंतु गावात मजुरांना दोन वेळच्या अन्नासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मजुरांची ही समस्या लक्षात घेऊन जिथे सर्वाधिक स्थलांतरित मजूर परतले आहेत अशा सहा राज्यांवर गरीब कल्याण रोजगार अभियान योजना केंद्रित राहील. त्यामुळे स्थलांतरित मजुरांना दिलासा मिळणार आहे.
दीड लाख मजुरांना दिलासा
गरीब कल्याण रोजगार अभियान योजना बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि ओडिसाच्या 116 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक राज्यातून 25-25 हजार मजुरांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे 66 टक्के मजूर परतले आहेत. या योजनेंतर्गत मजुरांना 125 दिवसांसाठी रोजगार दिला जाणार आहे. मजुरांना रोजगार देण्यासाठी 25 विविध प्रकारच्या कामांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या योजनेत 50 हजार कोटींची सामग्री वापरली जाईल.
पश्चिम बंगालच्या मजुरांना लाभ नाही
दरम्यान, या योजनेचा लाभ पश्चिम बंगालच्या मजुरांना मिळणार नाही. ग्रामविकास मंत्री एन. एन. सिन्हा म्हणाले की, ज्या वेळी ही योजना तयार केली जात होती, तेव्हा पश्चिम बंगालने आपल्या राज्यात परतलेल्या मजुरांचा आकडा उपलब्ध केला नाही. जर आम्हाला ही आकडेवारी मिळाली तर भविष्यात आम्ही त्यांनाही या योजनेत सामील करू.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply