मोहोपाडा : प्रतिनिधी
यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने भाताचे पीक खूपच चांगले आले होते. शेतकर्यांनी कापणीबरोबरच झोडणीला सुरुवात केली होती. मनुष्यबळाची कमतरता आणि दिवाळीचा सण यामुळे शेतकर्यांनी दोन दिवस कामे थांबवली होती. त्यातच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार गेले दोन दिवस पाऊस बरसला. या बरसलेल्या पावसाने रसायनीतही शेतीचे मोठे नुकसान केले.
अगोदरच तौक्ते वादळ, चक्री वादळ, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी याने हवालदिल झाला असतानाच शेतकर्यांनी घरी व शेतावर साठवून ठेवलेल्या भात पिकात या पावसाचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे. सायंकाळच्या वेळात पावसाने रिपरिप सुरू केली. तर सलग दोन दिवस पुन्हा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले.
दरम्यान, सलग तीन दिवस सुटी असल्याने चाकरमान्यांनी घरच्या साठवलेल्या भाताला झोडणीचे स्वरूप दिले होते. पावसाचे वातावरण बघून झोडलेले भात व पडलेला पेंडा सुक्या जागेवर ठेवण्याची एकच धावपळ उडाली होती. गावातून, शेजारी यांच्याकडून प्लास्टिक कागद आणून भात भिजण्यापासून वाचवि ण्याचा प्रयत्न शेतकरी करताना दिसत होता. तरीही अनेकांचे मोठे नुकसान झाले. अनेक संकटातून घरी आलेले पीक भिजताना बघून शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या पावसामुळे अनेक शेतकर्यांच्या मळण्या भिजल्या असून गुरांसाठी राखून ठेवण्यात आलेला सुका पेंढादेखील भिजला असल्याने गुराढोरांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परतीच्या पावसाने शेतकरी वर्गास नुकसानीस समोरे जावे लागले असून शासनाने याची त्वरेने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.