नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिक 2016 मध्येही रौप्य पदक जिंकले होते. एकेरी स्पर्धेत भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि एकूण दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे. भारताची सर्वात यशस्वी महिला बॉक्सर मेरी कोम हिला पद्मविभूषण 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय तिने पाच वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक, तसेच एक रौप्य आणि कांस्यपदक जिंकले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानला पद्मश्री पुरस्कार-2020ने सन्मानित करण्यात आले. झहीर खानची गणना भारताच्या सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. 2011च्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. त्याने त्या स्पर्धेत सर्वाधिक बळीही घेतले होते. मणिपूरची फुटबॉलपटू ओइनाम बेंबिम देवी हिला पद्मश्री पुरस्कार-2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यात बेंबिम देवीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताचे माजी हॉकीपटू एम. पी. गणेश यांनाही पद्मश्री पुरस्कार-2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या भारतीय संघाचा ते भाग होते. भारतातील सर्वोत्कृष्ट नेमबाजांपैकी एक जितू रायलाही पद्मश्री पुरस्कार-2020ने सन्मानित करण्यात आले. 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय यालाही पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले आहे. तरुणदीप रायनेही देशासाठी चांगले यश मिळवले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा 2006 मध्ये त्याने कांस्यपदक जिंकले होते. या खेळांमध्ये सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकण्यात त्याला यश आले आहे. पद्मश्री पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालचाही समावेश आहे. राणीच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. तिच्या नेतृत्वात यंदा भारतीय महिला हॉकी संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला.