पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई महापालिकेच्या संगणकिय प्रणालीत कंपनीच्या करावर लावण्यात आलेल्या दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी कंपनी मालकाकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी करणार्या व त्यातील एक लाख रुपयांचा पहिला हफ्ता स्विकारणार्या नवी मुंबई महापालिकेच्या सेस-एलबीटी स्थानिक संस्था कर विभागातील लिपिक (कंत्राटी कामगार) विनायक पाटील याला नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पथकाने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
यातील तक्रारदारांची खैरणे एमआयडीसीमध्ये कंपनी असून नवी मुंबई महापालिकेकडून आलेला सन 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर त्यांनी 2019 साली भरला होता. तक्रारदार यांनी 2013 ते 2016 या कालावधीतील सेस कर वेळेत न भरल्यामुळे त्यावर दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम त्यांना भरावी लागणार असल्याची भिती सेस-एलबीटी विभागातील कर्मचारी विनायक पाटील यांनी दाखविली होती. तसेच कोपरखैरणे येथील सेस-एलबीटी विभागातील कार्यालयीन संगणकिय प्रणालीमध्ये त्यांच्या दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी लिपीक विनायक पाटील याने त्यांच्याकडे तीन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे कंपनी मालकाने नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने पडताळणी करून सापळा लावला होता.
सोमवारी दुपारी लाच घेऊन गेलेल्या कंपनी मालकाकडून लिपीक विनायक पाटील याने त्याच्या कारमध्ये एक लाख रुपयांची रक्कम स्विकारल्यानंतर अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. ही कारवाई नवी मुंबई ऍन्टी करफ्शन ब्युरोच्या पथकाने केली.