पोयनाड : रामप्रहर वृत्त
विश्वविक्रमी काव्यसंमेलनाचे नियोजन, राष्ट्रीय विक्रमप्राप्त प्रकाशन सोहळा आणि अनेक विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांनी नावाजलेल्या साहित्यसंपदा समूहाचा तृतीय वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. पोयनाड येथील संपर्क बालग्राम येथे आयोजित केलेल्या वर्धापन दिनाला ज्येष्ठ साहित्यिक गजलकार ए. के. शेख, रिलायन्सचे जनसंपर्क अधिकारी, साहित्यिक रमेश धनावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. जीविता पाटील यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी केले. मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धनासाठी साहित्यसंपदा अविरत कार्य करत राहील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. ज्येष्ठ साहित्यिक ए. के. शेख यांनी मराठी भाषेचा अभ्यास मुलांनी करावा, असे सांगत काही बालकविता आणि गजल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात साहित्यसंपदातर्फे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणार्या व्यक्तींचा कार्यगौरव करण्यात आला. या वेळी रायगडमधील निवृत्त शिक्षक रामचंद्र लोकरे, अनंत देवघरकर, तसेच शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविणारे हनुमंत देशमुख, कुंदा झोपे, नीलिमा बेडसे-घायवट यांना शिक्षकरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला. त्याचबरोबर सीमा हरकरे, शशिकांत पाटणकर यांचा साहित्यसंपदा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते, लेखक किरण बोरकर, गजलकार रवींद्र सोनावणे, पत्रकार जीवन पाटील, श्रीनिवास गडकरी, ग्रामीण कथाकार लालसिंग वैराट, कवयित्री सलोनी बोरकर, स्मिता हर्डिकर, सीमा पाटील, ऋचा नीलिमा, दिलीप मोकल, सिद्धी गुंड, संकल्प बालग्रामचे व्यवस्थापक वैभव कुंभार आदी उपस्थित होते. साहित्यिक, सामाजिक उपक्रम राबविताना वेळोवेळी मदत करणार्या सदस्यांचे आभार कार्यक्रमाच्या शेवटी मानण्यात आले.