महाड ः प्रतिनिधी
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्यांवर भरमसाठ वीजबिलांची कुर्हाड कोसळली आहे. अशा नागरिकांची वीज बिले माफ करावीत, अशी भूमिका घेत दक्षिण रायगड भाजपच्या वतीने सरकारकडे मागणी करण्यात आली. याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. कोरोनाची वैश्विक महामारी, निसर्गाची अस्मानी व आघाडी सरकारची सुलतानी अशी संकटे महाराष्ट्रावर आली. या संकटांविरोधात भाजपने कंबर कसली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगडने कुचकामी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. मंगळवारी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांच्या वतीने सरकार व वीज वितरण कंपनीला तीन महिन्यांची आलेली भरमसाठ वीज बिले पूर्ण माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली. तसेच चुकीच्या बिलांची त्वरित दुरुस्ती करून द्यावी, अन्यथा भाजपच्या वतीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी देण्यात आली.