Breaking News

अमरावतीत आज कडकडीत बंद; जमाव आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावती ः प्रतिनिधी

राज्यात शुक्रवारी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांमधून हिंसाचार उसळल्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने शनिवारी (दि. 13) बंदची हाक दिली होती. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जनक्षोभ उसळून जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्रिपुरा राज्यात झालेल्या कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 ते 20 हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. यात अमरावती शहरातील अनेक दुकानांत तोडफोड झाली. काही दुकानदारांना मारहाणही करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील निर्माण झाला. या मोर्चाविरोधात भाजपने अमरावती शहर बंदचे आवाहन केले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला. अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आले होते. तरीही आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आपला संताप व्यक्त केला. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. सध्या अमरावतीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

जमावबंदी लागू

अमरावती शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत, तर तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

महाराष्ट्रात निघालेले मोर्चे एक सुनियोजित षडयंत्र -देवेंद्र फडणवीस

मुंबई ः अमरावतीमधील संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मोर्चे निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटतेय. त्रिपुरामध्ये जी घटना घडलीच नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे अत्यंत चुकीचे आहे. हे थांबायला हवे. शांतता राखणे गरजेचे आहे, असे आवाहन फडणवीस यांनी केलेय. सोशल मीडियावर चुकीचे फोटो व्हायरल करून हा सगळा प्रकार घडवण्यात आला आहे. जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलने होत आहेत, त्या मशिदीचे फोटो त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले हेही प्रकाशित करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित लोकांवर कारवाईदेखील केली आहे, असे फडणवीस म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवून महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यात हिंदूंची दुकाने जाळायची हे योग्य नाही. सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे, असे सांगून फडणवीस यांनी सरकारी पक्षाचे नेते स्टेजवर जाऊन भडकवणारी भाषणे करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे, असे म्हटले.

त्रिपुरातील घटनेचे पडसाद म्हणून दंगली होण्यापेक्षा दुर्दैवी संजय राऊतांनी केलेले वक्तव्य आहे. मला खूप कीव येते, वाईट वाटते. राजकारणासाठी ते किती लाचार झाले आहेत. आज स्व. बाळासाहेब ठाकरे जिवंत पाहिजे होते. त्यांनी एक थोबाडीत दिली असती.

-चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply