शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण

ठाणे ः प्रतिनिधी

भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक आघाडीच्या वतीने कोकणातील आदर्श शिक्षक आणि पाच संस्थाचालकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी मंत्री पाटील बोलत होते. या सोहळ्यास आमदार संजय केळकर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार विनय नातू, भाजपचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, संदीप लेले, नगरसेवक कृष्णा पाटील, शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, भाजपचे सचिन मोरे, रमेश आंब्रे, वीरसिंग पारछा आदी उपस्थित होते. बदलत्या काळात शिक्षकांनी वेगाने बदल आत्मसात केले. अन्यथा एका पिढीचे नुकसान झाले असते. त्याबद्दल शिक्षकांचा प्रत्येक व्यक्तीने सन्मान करावा. चांगला समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. आईच्या दृष्टिकोनातूनच शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पाहावे. मग ट्युशन-क्लासेस हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, असे मत मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. शिक्षकाने पोटार्थी न राहता स्वयंप्रकाशित व्हावे, तसेच व्यापक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्रातील एक दमदार नेतृत्व अशी दिवंगत वसंत डावखरे यांची ओळख होती. त्यांचीच परंपरा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून चालविली जात आहे, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी कौतुक केले. महाविकास आघाडी सरकारकडून शिक्षकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत भाजप शिक्षक आघाडीने शिक्षकांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन आमदार केळकर यांनी केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, वसंत डावखरे यांनी संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वसंत फुलविला होता. आता वसंतस्मृती पुरस्काराच्या माध्यमातून डावखरे साहेबांची स्मृती कायम राहील. माजी आमदार विनय नातू यांनी पुरस्कार स्वीकारताना शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांसाठी आमदार, शिक्षक संघटना आणि संस्थाचालकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. शैक्षणिक कामांबरोबरच शिक्षकांवर अन्य कामांचे नाहक ओझे लादण्यात येत आहे. शिक्षकांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केले. निवडणुकीच्या कामकाजासाठी शिक्षकांऐवजी बेरोजगार तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केले. एन. एम. भामरे यांनी प्रास्ताविक केले, तर विकास पाटील, विनोद भानुशाली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान; आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वीकारला पुरस्कार

कोकणात उत्तम शैक्षणिक कार्य करणार्‍या संस्थांचालकांमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे (जेबीएसपी) चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी आणि अंजुमन-ई-इस्लाम संस्थेचे कार्यकारी चेअरमन बुरहान हॅरीस यांच्या वतीने प्रतिनिधीने पुरस्कार स्वीकारला, तर परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार विनय नातू, सॅक्रेड हार्ट स्कूलचे सेक्रेटरी अल्बिन अ‍ॅँथोनी, अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे अध्यक्ष पुष्कराज वर्तक, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब हाटकर यांनी उत्कृष्ट संस्थाचालकाचा पुरस्कार स्वीकारला. या वेळी कोकणातील 130 गुणवंत शिक्षकांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply