Breaking News

ग्रामीण भागात रास्तधान्य सहज मिळण्याचा मार्ग मोकळा

रायगड जिल्ह्यात 252 नवीन दुकानांसाठी जाहीरनामे

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यासाठी नवीन 252 रेशन दुकाने सुरू करण्यासाठी जाहीरनामे काढले आहेत. यात शहरी भागातील 23; तर ग्रामीण भागातील 229 दुकानांचा समावेश आहे. नवीन दुकानांसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत संस्थांना अर्ज करता येतील.

जिल्ह्यात दोन हजार महसुली गावे आहेत. त्यात चार लाख 39 हजार 822 रेशनकार्ड आहेत, तर 17 लाख 51 हजार 314 लाभार्थी आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजना अशा दोन योजना राबवून या लाभार्थ्यांना त्याचा लाभ दिला जातो. सध्या जिल्ह्यात एक हजार 373 रास्तभाव धान्य दुकाने आहेत, परंतु ती अपुरी पडत आहेत. त्यामुळे 252 नवीन दुकाने सुरू करण्यासाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत. यात शहरी भागातील 23, तर ग्रामीण भागातील 229 दुकानांचा समावेश आहे.

साधारण दीड हजार लोकसंख्या आणि 400 रेशनकार्ड असतील, तर नवीन रेशनदुकान लोकांच्या मागणीवरून सुरू करता येते. जिल्ह्यात अशी मागणी नसतानाही लोकांची गरज लक्षात घेऊन पुरवठा विभागाने नवीन दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी साधारण 15 ते 20 नवीन दुकानांसाठी जाहीरनामे काढले जातात. या वेळी मोठ्या संख्येने जाहीरनामे काढण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही नवीन दुकाने सुरू करण्यासाठी परवाने देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. संपूर्ण राज्यात नवीन रेशन दुकान मंजुरीचा आराखडा तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. अंतिम आराखडा पूर्ण होईपर्यंत शहरी भागात नवीन दुकान मंजुरी देण्यास सरकारने तीन वर्षांपासूनच स्थगिती दिली आहे. त्यामुळे शहरात नवीन दुकानांना मंजुरी मिळत नव्हती, परंतु आता ही स्थगिती उठवण्यात आली आहे. नवीन आराखडा तयार होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे नवीन दुकानांना मंजुरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात शहरी भागात 23 नवीन दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात नऊ, तर अन्य नगरपालिकांमध्ये 10, तसेच नगरपंचायतींमध्ये चार जाहीरनाम्यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील जनतेची रेशनसाठी होणारी पायपीट थांबावी, त्यांना घरापासून जवळच रेशनवरील धान्य उपलब्ध व्हावे यासाठी नवीन दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत.

-मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply