टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडवर मात
दुबई : वृत्तसंस्था
जोश हेझलवूडच्या (3/16) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (50 चेंडूंत नाबाद 77 धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (38 चेंडूंत 53) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या रूपात नवा ट्वेन्टी-20 विश्वविजेता उदयास आला आहे.
न्यूझीलंडने दिलेले 173 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 18.5 षटकांत सहज गाठून पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 जेतेपदावर नाव कोरले. कर्णधार अॅरोन फिंच (5) पुन्हा अपयशी ठरल्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी दुसर्या गड्यासाठी 92 धावांची वेगवान भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर माघारी परतल्यावर मार्शने हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत ग्लेन मॅक्सवेलच्या (नाबाद 28) साथीने संघाला जेतेपद मिळवून दिले. मॅक्सवेलने लगावलेला विजयी फटका सीमारेषेपार जाण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मैदानात धाव घेतली.
तत्पूर्वी, फिंचने निर्णायक नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. हेझलवूडच्या प्रभावी मार्यासमोर डॅरेल मिचेल (11) लवकर बाद झाला. अॅडम झॅम्पानेसुद्धा टिचून मारा केल्याने विल्यम्सन आणि मार्टिन गप्टिल यांना पहिल्या 10 षटकांत फक्त 57 धावा करता आल्या.
यानंतर मात्र विल्यम्सनने आक्रमक रूप धारण करताना 32 चेंडूंत अर्धशतक झळकावले. गप्टिल (28), ग्लेन फिलिप्स (18) साथ सोडून गेल्यानंतरही विल्यम्सनने 10 चौकार आणि तीन षटकारांसह 85 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. हेझलवूडनेच त्याला माघारी पाठवले. मग जिमी नीशाम (नाबाद 13) आणि टिम सेईफर्ट (नाबाद 8) यांनी उपयुक्त फटकेबाजी केल्यामुळे न्यूझीलंडने 20 षटकांत 4 बाद 172 अशी धावसंख्या उभारली होती.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : 20 षटकांत 4 बाद 172 (केन विल्यम्सन 85, मार्टिन गप्टिल 28; जोश हेझलवूड 3/16) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया : 18.5 षटकांत 2 बाद 173 (मिचेल मार्श नाबाद 77, डेव्हिड वॉर्नर 53; ट्रेंट बोल्ट 2/18). सामनावीर : मिचेल मार्श.