Breaking News

क्षयरोग शोधमोहिमेस सहकार्य करावे; जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांचे आवाहन

अलिबाग : जिमाका

क्षयरोग्यांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रायगड जिल्ह्यात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेतली असून, नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी जिल्हा क्षयरोग कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते 31 ऑक्टोबर 2021 अखेर दोन हजार 794 क्षयरुग्ण शोधण्यात आले आहेत. आणखी क्षयरुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यांना  शोधून क्षयरोगमुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील अतिजोखमीच्या कार्यक्षेत्रात 15 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन लक्षणे असणार्‍या संशयित क्षयरुग्णांना जवळच्या आरोग्य संस्थेत नेऊन तपासणी करणार आहेत. त्याची थुंकी नमुने तपासणीसह एक्स-रे मोफत काढले जाणार आहेत.  ज्यांचा तपासणी निष्कर्ष अहवाल क्षयरोगासाठी पॉझिटिव्ह येईल त्याच्यावर 6 ते 28 महिन्यापर्यंत (क्षयरुग्णाच्या प्रकारावरून) औषधोपचार करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक रुग्णास प्रति महिन्याला 500 रुपये निक्षय पोषण योजनेसाठी भत्ताही दिला जाणार असल्याचे डॉ. देवकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  कोणत्याही व्यक्तीस दोन आठवड्यांपासून अधिक कालावधीचा खोकला किंवा ताप येत असेल, त्यास भूक मंदावणे, रात्रीचा येणारा ताप व घाम, वजनात लक्षणीय घट थकवा येणे, सतत छातीत दुखणे किंवा थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर कातडीखाली गाठी असणे यापैकी एक किंवा जास्त लक्षणे असल्यास त्वरित क्षयरोगाच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. या मोहिमेसाठी तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी हे पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील. वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय हे संशयित क्षयरुग्णांच्या बेडका तपासणी व क्ष-किरण तपासणी याबाबत पर्यवेक्षण व सनियंत्रण करतील, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व मनपा आरोग्य अधिकारी यांना राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातील वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, टिग्री हेल्थ व्हिजीटर्स हे मदत करतील, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी या वेळी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ठोकळ, सतीश दंतराव, समन्वयक दत्तात्रय शिंदे, औषध निर्माण अधिकारी मनोज बामणे, वृषाली पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply