Breaking News

उरणमधील पाणथळीने घेतला मोकळा श्वास

पाण्याला अटकाव करणारे पाच मार्ग खुले

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील पाणजे पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे पाच बुजवलेले मार्ग खुले करण्यात आले आहे. सिडको, महसूल आणि वन विभागाचे अधिकारी, सोबतच नेटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे पर्यावरणप्रेमी तसेच मासेमारी समुदायाच्या प्रतिनिधींनी 300 हेक्टरच्या परिसरातील हे पाचही प्रवाह मार्ग तपासले.

हा पाणथळ परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्याची याचिका वनशक्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली. श्री एकविरा आई प्रतिष्ठानच्या याचिकेला प्रतिसाद देताना राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाच्या पश्चिम क्षेत्र खंडपीठाने रायगड जिल्हाधिकारी व शहर नियोजनकार सिडकोकडे राज्य सरकारच्या आदेशांची खातरजमा करण्यास सांगितले.

वर्षभर चाललेल्या संघर्षानंतर जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घातपाताच्या तक्रारींची दखल घेत पाणथळ क्षेत्रात भरतीच्या पाण्याला अटकाव करणारे मार्ग खुले करण्यात पुढाकार घेतला. बुजविण्यात आलेले मार्ग खुले करण्यात येतील व या कामात अधिकार्‍यांकडून पाणथळ क्षेत्रावर नजर ठेवली जाईल, अशी हमी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.

नेटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सरकार दरबारी पाणथळ क्षेत्राला बायोडायव्हर्सीटी पार्कचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यासंबंधी विनंती केली आहे. तर हे पाणथळ क्षेत्र अनेक प्रकारच्या माशांचे प्रजोत्पादक केंद्र असून या ठिकाणी भरतीच्या पाण्याचा मार्ग खुला झाल्याने मच्छीमार समुदायात समृद्धी नांदेल, असे विचार श्री एकविरा प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी व्यक्त केले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply