उरण : वार्ताहर
उरण येथील मोरा जेट्टीची दुरवस्था झाली असून मेरी टाइम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रवाशाच्या सुखसोईंकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. त्याकडे मेरी टाइम बोर्डने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहे. मोरा जेट्टीलगत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. गेली दोन वर्षांपासून शौचालय बंद आहे. पाण्याची टाकी आहे पण त्यात पाण्याची सोय नाही. विशेषत: महिला वर्गाला खूप त्रास होत आहे. लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी महिला वर्गाची मागणी आहे. उरणपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई शहरात जाण्यासाठी जलमार्ग प्रवास सुखकर असल्याने मुंबईत जाण्यासाठी प्रवाशांना मोरा जेट्टी हून बोटीने भाऊचा धक्का (मुंबई) या जल मार्गाने प्रवास करावा लागतो. दिवसात सुमारे 400 ते 450 प्रवासी प्रवास करीत असतात. मोरा जेट्टी ते भाऊचा धक्का (मुंबई) या सागरी प्रवासास 40 मिनिटे लागतात. त्यासाठी प्रवाश्यांना एकेरी भाडे 80 रुपये तर लहान मुलांना (हाफ) 39 रुपये मोजावे लागतात. जेट्टीची दुरवस्था झाली आहे. मेरी टाइम बोर्डाने लवकर समस्या सोडवावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
मोरा जेट्टीची दुरुस्ती करावी. त्याचप्रमाणे शौचालयाची दुरवस्था या विषयी मुंबई येथील अभियांत्रिकी विभागाला कळविण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.
-पी. बी. पवार, मोरा बंदर निरीक्षक
मोरा जेट्टीवर असलेले शौचालय लवकरात लवकर सुव्यवस्थित करावे. महिलांना होणार्या त्रासाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे. या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. सेप्रेट पे आणि पार्किंगप्रमाणे खाजगी टेंडर द्यावे.
-मनीषा घरत, प्रवासी, उरण