कर्जत : बातमीदार
शासकीय कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 18) कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या सर्व तक्रारीवर तहसीलदारांनी या वेळी चर्चा केली.
कर्जत डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून मनसेचे कार्यकर्ते चालत तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे तहसील कार्यालयाच्या बाहेर सर्व कार्यकर्ते बसले आणि त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.त्यानंतर निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कार्यालयात येण्याची विनंती केली. त्यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्यासह तालुका उपाध्यक्ष अकबर देशमुख, यशवंत भवारे, शहर अध्यक्ष समीर चव्हाण, माथेरान शहर अध्यक्ष संतोष कदम, महिला तालुका अध्यक्ष आकांशा शर्मा, नगरसेवक हेमंत ठाणगे, माजी नगरसेवक धनंजय दुर्गे, मनविसे तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर, विभाग अध्यक्ष विनोद शेंडे, संदेश काळभोर, ऋषिकेश पाटील, हेमंत चव्हाण, पंकज बुंधाटे, ओंकार तरे, भारती कांबळे आदी उपस्थित होते.
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी मनसेच्या निवेदनानुसार सर्व मुद्यांवर चर्चा केली. पूरग्रस्तांना नुकसानभरपाईचे वाटप, हमीभाव भात खरेदी केंद्र, तालुक्यातील बेकायदेशीर बांधकामे आदी विषयांवर या वेळी चर्चा झाली. अनधिकृत बांधकाम करणार्यांकडून आतापर्यंत दोन कोटी रुपयांचा तर अवैध वाळू उत्खनन करणार्यांकडून पाच कोटी रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी या वेळी दिली. दगड खाण मालकांना इ पास दिले असून त्यांच्याकडून आगाऊ रॉयल्टी वसूल केली जात असल्याचे नायब तहसीलदार राठोड यांनी सांगितले. अन्य मागण्यांवर 15 दिवसात कार्यवाही केली जाईल असे आश्वासन तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहे.