पं. स.चे माजी सभापती प्रकाश जितेकर, माजी उपसभापती देविदास पाटील भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेकापचे ज्येष्ठ नेते प्रकाश जितेकर तसेच माजी उपसभापती व उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते देविदास पाटील यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकाप व उद्धव ठाकरे गटाला हादरा दिला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी मुंबईत पक्षप्रवेश केला.
या वेळी उद्योजक मंगेश लबडे, रवींद्र जितेकर, दयानंद जितेकर, अनुज जितेकर, दीपक डाऊर, निलेश गायकवाड यांनीही भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते के. ए. म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, प्रवीण खंडागळे, तानाजी पाटील, सुनील माळी, अविनाश गाताडे, विद्याधर मोकल, प्रवीण ठाकूर, ज्ञानेश्वर सुर्वे, मनोज पवार, महादेव कांबळे, जीवन टाकले, रोशन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश जितेकर हे दापोली ग्रामपंचायतीचे 15 वर्षे सरपंच राहिलेले व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्यासोबत कार्य केलेले कै. रघुनाथ जितेकर यांचे पुत्र आहेत. त्यांचा आदर्श घेऊन प्रकाश जितेकर कार्यरत राहिले.त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे, तर देविदास पाटील हे युवकांची ताकद असलेले खंबीर कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. त्यांनी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम केले आहे.
पनवेलमध्ये शेकापच्या काही मतलबी आणि संधीसाधू पुढार्यांमुळे दुफळी निर्माण होऊन या पक्षाची वाताहत झाली आहे. उरलासुरलेला शेकाप फक्त शायनिंगमध्ये गुरफटला आहे, अशी चर्चा पनवेलमध्ये होत आहे.