खोपोली : प्रतिनिधी
तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध दर्शवून नैना संघर्ष समिती स्थापन केली आहे.
या नैना संघर्ष समितीचे अध्यक्ष राकेश गव्हाणकर, ज्येष्ठ सल्लागार उमेश गावंड, विजय शिंदे, सुरेश दिसले, दशरथ लोते, शीतल वाघरे, पद्माकर पाटील, मनोज मिसाळ, संभाजी पाटील यांनी लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता.
दरम्यान, खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या मध्यस्थीने संघर्ष समितीचे पदाधिकारी व बाधीत शेतकर्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला सिडको नैना विभागाचे वरिष्ठ नियोजनकार ज्ञानेश्वर रा. भदे यांनी हजेरी लावून, निवडणुकीनंतर संयुक्त बैठक घेऊन नैना बधीत शेतकर्यांच्या प्रश्नांसंदर्भात मार्ग काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे लेखी आश्वासन दिले.