Breaking News

रायगडात राष्ट्रवादीला मोठा धक्का ; जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचा राजीनामा

आघाडीत घुसमट होत असल्याची भावना

कर्जत ः बातमीदार
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आघाडीत आपली घुसमट होत असल्याचे सांगत जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रायगड दौरा सुरू असतानाच लाड यांनी दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, मात्र कर्जत-खालापूर तालुक्यांत शिवसेना स्वबळाचा नारा देत आहे. अशावेळी पक्षाचा निर्णय मान्य करणे आपल्यावर बंधनकारक असल्याने होणारी घुसमट तत्त्वांना पटणारी नाही आणि म्हणून असलेल्या पदावरून स्वतःहून दूर होत असल्याचे कर्जत येथे मंगळवारी (दि. 23) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरेश लाड यांनी जाहीर केले. आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात कार्यकर्त्यामार्फत पोहचविला असल्याचेही त्यांनी सांगितले.
लाड पुढे म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार असताना स्थानिक आमदार स्वत:च्या पक्षाचे निवडणूक चिन्ह लावून विकासकामांची भूमिपूजने करतात. प्रशासकीय भवनाच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न केले होते. तरीही भूमिपूजन समारंभाला आपल्याला न बोलावण्याचा आदेश स्थानिक आमदारांनी अधिकार्‍यांना दिला. त्यानंतर आपण तेथे जाऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, मात्र शिवसेनेवाल्यांनी मलाच लक्ष्य केले. याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना कळविले, पण वरिष्ठांकडून तक्रारींवर लक्ष दिले जात नव्हे. सातत्याने आघाडीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले जात होते. शिवसेनेच्या आमदाराला रान मोकळे सोडले जात असल्याने पक्षाच्या जोखडात अडकून पडण्यापेक्षा काम करण्याचे स्वातंत्र्य मिळावे यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद मी सोडत आहेे.
आमदार महेंद्र थोरवे यांना इशारा
सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना आपल्याला कोणतेही दुःख होत नसून आपण समाधानी आहे, मात्र माझ्या व्यवसायावर शिंतोडे उडविणार्‍या मामा-भाचे यांचा व्यवसाय काय हे आता शोधून जनतेसमोर आणणार असल्याचे नाव न घेता सांगितले. या वेळी त्यांचा रोख आमदार महेंद्र थोरवे व त्यांच्या भाच्यावर होता. त्यासाठी आपले काहीही झाले तरी त्याची किंमत मोजायला तयार असल्याचा निर्धारही लाड यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply