उरण : प्रतिनिधी
जबरी चोरी व गुन्ह्यातील आरोपी यांच्या मुसक्या आवळून न्हावाशेवा पोलिसांकडून आरोपींनी गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने व सोन्याची लगड शिताफीने हस्तगत केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण येथील तक्रारदार यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून घरामध्ये प्रवेश करून 38.40 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले. याबाबतची तक्रार फिर्यादीने न्हावाशेवा पोलीस ठाण्यात दाखल केली.
या गुन्ह्यातील आरोपीबाबत काहीएक माहिती नसताना या गुन्ह्याचा तपास कसोशीने करून गुन्ह्यातील संशयित इसमाबाबत तपास करून तांत्रिक तपासाचे दरम्यान तक्रारदार यांच्या मुलीचा उरण तालुक्यातील मोरा को.ए.सो.इंग्लिश स्कूलजवळ राहणारा मित्र याच्यावर संशय आला. त्याला शिताफीने ताब्यात घेऊन तपास केला असता फिर्यादी यांची मुलगी (रा. गव्हाण) हिने मदत केली असल्याचे आरोपीने सांगितले. तिलाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने हे वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे विक्री केल्याचे उघड झाल्याने संबंधित ज्वेलर्स यांना तपासकामी बोलावून सखोल चौकशी केली.
याशिवाय न्हावाशेवा पोलीस ठाण्यातील भा.दं.वि. कलम 392, 34 या गुन्ह्यातील फिर्यादी हे दुपारी भाजीपाला आणण्यासाठी डेली मार्ट सेक्टर 17 या ठिकाणी गेले. तेथून किराणा, भाजीपाला घेऊन रिक्षाने पुन्हा त्यांच्या घरी ठाकूर रेसिडेंसीच्या कंपाऊंटमध्ये येऊन समान घेऊन लिफ्टमध्ये ठेवत असताना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचली. त्यानंतर सोसायटीच्या कंपाऊंटमध्ये उभे असलेल्या काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलीवरून फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अथक प्रयत्न करून गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चेन मोडून तयार केलेली एक लाख 12 हजार रुपयांची एक 35.220 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड न्हावाशेवा पोलिसांनी जप्त केली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यामध्ये न्हावाशेवा पोलिसांनी एकूण 419.22 ग्रॅम सोन्याचे दागिने व सोन्याची लगड जप्त केली आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर निकम, पो.हा. राजेंद्र बोराटे, वैभव शिंदे, पो.ना. महेंद्रसिंग रजपूत, विकास जाधव, गणेश सांभरे, सागर डाकी, संजय सकपाळ, शिवाजी बसरे व प्रवीण पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.