Breaking News

इंग्लंडने वेस्ट इंडिजला अवघ्या 45 धावांत गुंडाळले

सेंट किट्स : वृत्तसंस्था

दुसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दारूण पराभव केला. विश्वविजेत्या विंडीज संघाला इंग्लंडने फक्त 45 धावांत बाद केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करणार्‍या विंडीजने इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नांगी टाकली.

गेल आणि हेटमायरसारखे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडूही विंडीजचा लाजिरवाणा पराभव रोखू शकले नाहीत. इंग्लंडकडून सॅम बिलिंग्जने धुवांधार फलंदाजी केली; तर ख्रिस जॉर्डनने ऐतिहासिक गोलंदाजी करीत विंडीजला जबर धक्के दिले. बिलिंग्ज आणि जॉर्डनच्या जोरावर इंग्लंडने दुसरा टी-20 सामना 137 धावांनी जिंकला.

विंडीजचा पूर्ण संघ 11.5 षटकांत फक्त 45 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने दोन षटकांत सहा धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले. याशिवाय आदिल राशिद, प्लंकेट आणि डेव्हिड विली यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. या विजयाबरोबरच तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. सुरुवातीला इंग्लंडची पडझड झाली. फक्त 32 धावांत इंग्लंडचे चार गडी बाद झाले होते, मात्र त्यानंतर ज्यो. रूट आणि बिलिंग्जने डाव सावरला. रूटने 40 चेंडूंत 55 धावांची खेळी केली. रूट बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या बिलिंग्जने विंडीजच्या गोलंदाजीची पिसे काढली. मैदानावर चारी बाजूला षटकार आणि चौकारांची बरसात केली. बिलिंग्जने 47 चेंडूंत 87 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि 10 चौकार लगावले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply