Breaking News

कर्जत नगरपालिकेचा नागरिकांना दिलासा

लॉकडाऊनमध्ये व्यावसायिकांसाठी वेळेची नियमावली

कर्जत ः बातमीदार

एमएमआरडीए रिजनमधील नगरपालिका हद्दीत कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन व्यवसायाला मोकळीक देण्यात आली आहे, मात्र त्यात सरसकट व्यवहार सुरू ठेवणे कर्जत शहरात कोरोनाचा फैलाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.त्यामुळे कर्जत नगर परिषदेने पुढाकार घेऊन सर्वांना वेळ ठरवून देण्यात आली असून त्या-त्या दिवशी ती ती दुकाने उघडली जाणार आहेत. दरम्यान, पालिकेने हा निर्णय घेण्याआधी सरकारी अधिकार्‍यांकडून बाजू समजून घेतली आणि नंतर व्यापारी फेडरेशनबरोबर चर्चा करून मार्ग काढण्यात आला, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी दिली. दीड महिन्याचा कालावधी लोटला असून कोरोनाला दूर ठेवण्यात कर्जत शहराला यश आले आहे. ज्या वेळी कर्जत शहरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, त्या वेळी कर्जत शहराने सलग चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली. त्याच वेळी त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही व्यवहार होत नव्हते आणि त्यामुळे कर्जत शहर अद्याप कोरोनापासून दूर आहे, मात्र 4 मे रोजी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आलेल्या नवीन अटी आणि शिथिल करण्यात आलेले नियम ही बाब लक्षात घेऊन कर्जत नगरपालिका हद्दीत कोणत्या बाबींना सूट देण्यात आली हे जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुढाकार घेतला आणि सर्व प्रमुख अधिकार्‍यांची 5 मे रोजी भेट घेतली. 4 मेच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर अन्य सर्व ठिकाणी व्यवहार सुरळीत झाले, पण कर्जत शहरात मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही बाबीत सूट देण्यात आली नव्हती. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष जोशी यांनी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि पालिका मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यासोबत चर्चा करून शासनाच्या नियम-अटी समजून घेतल्या. त्यानंतर आपले सर्व सहकारी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह कर्जत व्यापारी फेडरेशनच्या पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा केली. त्यानुसार कर्जत नगरपालिका हद्दीतील सोन्या-चांदीची तसेच हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक आणि मॅकॅनिकल वर्क्सची दुकाने 6, 11, 12 आणि 17 मे या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कपड्यांची आणि चप्पल-बुटांची दुकाने 7, 9, 13 आणि 19 मे या दिवशी उघडी राहणार आहेत. त्याचवेळी कटलरी, भांडी, स्टेशनरी, स्वीट आणि खाद्यपदार्थांची दुकाने 8, 10, 14 आणि 16 मे या कालावधीत उघडी राहणार असून सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सूचना करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍या दुकानदारांवर पालिका कारवाई करणार आहे. पान टपरी, हॉटेल, विक्रीच्या गाड्यांना सूट देण्यात आली नसून ते व्यवहार बंदच राहणार आहेत. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू आणि दुधाची दुकाने नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे कर्जत नगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply