Breaking News

काँग्रेस आघाडीचा निक्काल लागणार; मोदींचा दावा

भागलपूर : वृत्तसंस्था

येत्या 23 मे रोजी केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार असून, त्यानंतर काँग्रेस आणि विरोधकांची टुकडे टुकडे गँग तुकडे तुकडे होऊन विखरून जाईल, अशा शब्दांत केंद्रात पुन्हा आपले सरकार विराजमान होणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर टीकेचा प्रहार केला. ते बिहार राज्यातील भागलपूर येथील प्रचार सभेत बोलत होते.

 या वेळी केंद्रात पुन्हा आपलेच सरकार येईल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. दहशतवाद आणि नक्षलवादाशी दोन हात करण्यासाठी सुरक्षा दलांना खुली सूट देण्यात आली असून, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही नक्षलवाद आणि दहशतवादाशी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही मोदी म्हणाले. या वेळी पंतप्रधानांनी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली.

 भागलपूरमधील या प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. मोदी म्हणाले, हे महामिलावटी लोक भ्रष्टाचाराला चालना देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांचा आमच्या जवानांना निशस्त्र आणि असहाय करण्याचाच प्रयत्न आहे. केंद्रात पुन्हा मोदी सत्तेवर आले, तर देशातील निवडणूकच संपून जाईल, असे भय हे महामिलावटी लोक लोकांमध्ये पसरवत आहेत.

त्याचप्रमाणे घटनात्मक संस्थांनादेखील धोका असल्याचे ते म्हणत आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास त्यांची भ्रष्टाचाराची दुकाने बंद होणार आहेत, हे त्यांना चांगलेच माहीत आहे आणि यासाठीच ते समाजात भय पसरवण्याचे काम करीत आहेत. माझे सरकार आल्यास यांचे वंशवादाचे राजकारण संपून जाणार आहे. संरक्षण करारांमधील दलाली संपणार आहे. मी विरोधकांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही.

 2014चा भारत आठवून पाहा. तेव्हा पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना पाठवत असे. त्यानंतर तो भारताला धमकीही देत असे. त्यावेळी काँग्रेसचे सरकार केवळ कागदी घोडे नाचवण्यापर्यंतच मर्यादित होते. आम्ही मात्र त्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. आता पाकिस्तान जगात फिरून रडतोय, मात्र त्याला कुणीही भीक घालत नाही अशी परिस्थिती आहे.

 दहशतवादाविरोधात आम्ही एकीकडे कठोर पावले उचलत असताना काँग्रेस मात्र पाकिस्तानशी चर्चा केली जाईल, असे म्हणत आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

काँग्रेस आता घाबरला असून, त्याला अविश्वासाने घेरले आहे. काँग्रेस जवानांसोबत आहे की दहशतवाद्यांसोबत, याचे थेट उत्तर आता देशाला हवे आहे.

-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply