Monday , June 5 2023
Breaking News

कर्जतमध्ये जि.प. गट वाढणार नसल्याने निराशा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद गटांची संख्या वाढणार नाही. तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे पुर्वीप्रमाणे सहा गट राहणार आहेत. त्यामुळे सात गट होणार म्हणून तयारीला लागलेल्या इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, लोकसंख्या वाढल्याने सध्याच्या प्रभागातदेखील फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात असून मतदारांची संख्या वाढविण्याच्या नवीन नियमांमुळे कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद गट वाढणार नाहीत. कर्जत तालुक्यात सध्या रायगड जिल्हा परिषदसाठी सहा गट आहेत. यापूर्वी 2017 मध्ये गट निश्चित केले त्यावेळी लोकसंख्या 22 हजार निश्चित करण्यात आली होती. 2012च्या सार्वत्रिक निवडणुकीत कर्जत तालुक्यात पाच गट होते आणि त्यात वाढ होऊन सहा झाले होते. त्यात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे गट वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. गेले सहा महिने त्याचीच चर्चा होती, मात्र जिल्हा परिषदच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारसंख्या निश्चित करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषद गट वाढण्याची शक्यता मावळली आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्वी असलेली 22 हजार लोकसंख्येची अट वाढवून आता एका गटामध्ये मतदारसंख्या 28 हजारापर्यंत असणार आहे. ते लक्षात घेता सध्या असलेल्या गटांमध्येदेखील फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण काही गटांमध्ये 28 हजाराच्या आसपासच्या लोकसंख्येचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बाजूच्या गटातील एखादी ग्रामपंचायत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात सध्या असलेल्या सर्व गटांमध्ये बदल अपेक्षित आहेत. 2017च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कर्जत तालुक्यात खांडस, पाथरज, उमरोली, नेरळ, सावेळे आणि बीड बुद्रुक हे सहा गट होते. त्यातील नेरळ गटामध्ये मतदार संख्या अधिक होती. आता राज्य निवडणूक आयोगाने एका गटात 28 हजार मतदारसंख्येचे लक्षांक निश्चित केले आहे. ते लक्षात घेता जुन्या गटांमध्ये किरकोळ बदल अपेक्षित आहेत. 28 हजाराच्या मागे पुढे लोकसंख्या गाठण्यासाठी अनेक गटांमधील ग्रामपंचायती कमी-जास्त कराव्या लागणार आहेत. त्यामुळे कदाचित कर्जत तालुक्यातील सध्याच्या सहा गटाची नावेदेखील बदलली जाऊ शकतात. नेरळचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन नेरळ ममदापूर संकुल मिळून नगर परिषद होण्याची शक्यता असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट निर्माण करताना राज्य निवडणूक आयोगाला त्याबाबत विचार करावा लागणार आहे. त्यामुळे नेरळसारख्या शहरीकरण झालेल्या जिल्हा परिषद गटात निवडणूक लढविणार्‍या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संभाव्य नगर परिषदची भीतीदेखील सतावणार आहे.  कर्जत तालुक्यात सात जिल्हा परिषद गट तयार होणार म्हणून सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र जिल्हा परिषदेचे गट वाढणार नसल्याने इच्छुकांची निराशा झाली आहे. सहा पैकी तीन गट हे महिलांसाठी आरक्षित राहणार असल्याने आणि त्यात अनुसूचित जाती-जमाती तसेच ओबीसी आरक्षण लक्षात घेता इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

-संतोष पेरणे

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply