पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यात क्षयरुग्णांना शोधण्यासाठी आरोग्य विभागाने आदिवासी आणि ग्रामीण भागात विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथक घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. संशयित रुग्णांना तपासणीसाठी आरोग्य केंद्रात आणून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. समुदाय वैद्यकिय अधिकारी, आशा, स्वयंसेवक, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यीका यांचे आरोग्य पथक घरोघरी जाऊन संशयित क्षयरुग्णांचा शोध घेणार आहेत. लक्षणे असणार्या संशयित रुग्णांची माहिती घेऊन त्यांना जवळच्या आरोग्य संस्थेत नेवून तपासणी केली जाणार आहे. त्या रुग्णांचे थुंकी नमुने तपासणीसह एक्स-रे मोफत काढले जाणार आहेत. ज्यांचे तपासणी निष्कर्ष अहवाल क्षयरोगासाठी पॉझिाटिव्ह येईल त्यांच्यावर 6 ते 8 महिन्यांपर्यंत औषधोपचार करण्यात येणार आहे. रुग्णाला प्रति महिन्याला 500 रुपये भत्ताही दिला जाणार आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी आणि वैद्यकीय अधिकारी सायली मानकर यांनी दिली. दोन आठवड्याहुन आधिक कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट, भुक मंदावणे, मानेवर गाठी येणे, थुंकीवाटे रक्त येणे अशी या आजाराची प्रमुख लक्षणे असून नागरिकांनी दक्ष व सजग राहून वेळीच उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.