साक्षी दाभेकरला जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिले अपंगत्व प्रमाणपत्र
अलिबाग : प्रतिनिधी
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकर हिला बुधवारी (दि. 8) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. 22 जुलैच्या दरड दुर्घटनेत साक्षी हिने जीवाची पर्वा न करता दोन वर्षीय मुलाचे प्राण वाचविले होते. याबाबत डॉ. सुहास माने यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला.
22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावचा डोंगर कोसळून पायथ्याशी असलेली सहा घरे दरडीखाली गाडली गेली. या दुर्घटनेत पाच जणांचा दरडीखाली अडकून मृत्यू झाला. साक्षी दाभेकर हीसुद्धा एका घरात दोन वर्षीय मुलाचा सांभाळ करीत होती. त्या घरावरही दरड कोसळली असताना दोन वर्षांच्या मुलासह स्वतःचा जीव वाचविण्यासाठी खिडकीतून बाहेर उडी मारली. त्याच वेळी घराची भिंत तिच्या पायावर पडली. भिंत पायावर पडूनही साक्षी हिने प्रसंगावधान दाखवून दोन वर्षीय मुलाचा जीव वाचविला, मात्र साक्षीचा उजवा पाय या दुर्घटनेत निकामी झाल्याने तो
कापावा लागला.
साक्षी हिच्यावर मुंबई येथे केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. साक्षी हिला शासनाकडून, राजकीय नेत्यांकडून आणि इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दरड दुर्घटनेत साक्षी हिला अपंगत्व आले असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी तिने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आज जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी तिचे कुटुंबीय, डॉक्टर आदी उपस्थित होते.