नवी दिल्ली : वृत्तसंस्था
घरचे मैदान गाजवणार्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताने न्यूझीलंडविरुद्धची वन डे मालिकाही जिंकली. आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा फॉर्म अतिशय चांगला असल्याने अनेकांनी भारताला विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार मानले होते, मात्र घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वन डे मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतरही भारतीय संघाचे मनोधैर्य कमी झाले नसल्याचे वक्तव्य विराट कोहलीने केले होते, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा असल्याचे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ संपूर्ण मालिकेत भारतापेक्षा सरस खेळला यात काही वादच नाही. ऑस्ट्रेलियाचा हा संघ विश्वचषक विजयासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतो. माझ्या मते विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. इंडिया टीव्ही वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलत असताना गांगुलीने आपले मत मांडले. या वेळी गांगुलीने विश्वचषकात कोणत्याही संघाला हलके लेखणे योग्य ठरणार नसल्याचेही म्हटले आहे.
भारतीय संघाने मालिकेत भरपूर प्रयोग केले आहेत. भारताचा सध्याचा संघ खूप चांगला आहे. विश्वचषकासाठी बराच कालावधी आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी आपल्या खेळाडूंना कामगिरीत सातत्य आणण्याची गरज आहे, असे सांगून फिंचच्या ऑस्ट्रेलियन संघाने मला जुन्या ऑस्ट्रेलिया संघाची आठवण करून दिली, जो संघ भारतात येऊन भारताला हरवत होता, असे गांगुली म्हणाला.