Breaking News

विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीकडून आरपीआय नेते जगदिश गायकवाड यांच्या तडीपारीचा जाहीर निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी सुरू असलेल्या चळवळीत प्रामुख्याने सहभागी असलेले आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना पोलिसांच्या माध्यमातून ठाकरे सरकारने तडीपारीचा जो आदेश काढला आहे, त्याचा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने जाहीर निषेध केला आहे. त्या संदर्भातील निषेधाचे पत्रक समितीच्या वतीने काढण्यात आले आहे.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनात मुंबई, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्त भूमिपूत्र एकवटला आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. त्याप्रमाणे आरपीआयचे नेते व नगरसेवक जगदिश गायकवाडही सहभागी आहेत. त्यांनी या चळवळीत बहुजन समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडले, हा लढा पुढे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे ही चळवळ अधिक फोफावली. असे असताना ही चळवळ दडपण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने त्यांना पोलिसांच्या माध्यमातून तडीपारीचा आदेश काढला, परंतु ही चळवळ आता अधिक जोमाने फोफावेल हे सरकारने लक्षात घ्यावे. या तडीपार आदेशाचा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती जाहीर निषेध करीत असून लवकरच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना हा आदेश रद्द करणारे निवेदन देण्यात येईल, असे कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील व कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply