कर्जत : प्रतिनिधी
येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांच्या एका चित्राची निवड चीनमध्ये होणार्या चित्रप्रदर्शनासाठी झाली आहे. जगातील नामांकित 50 चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनांत मांडण्यात येणार आहेत. चीनमधील पहिल्या किंग लियन 2021 पेस्टल प्रदर्शन आणि सातव्या झूहाई शुतोंग स्टुडिओ पेस्टल आमंत्रित प्रदर्शनासाठी जगभरातून तेवीस चित्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतातून आमंत्रित केले गेलेले पराग बोरसे हे एकमेव चित्रकार ठरले आहेत. या प्रदर्शनामध्ये चीनमधील 55 आणि आंतरराष्ट्रीय 23 चित्रकारांचा समावेश आहे. वांझाई सिटीमधील लियन यीकिंग पेस्टल गॅलरी ऑफ फोकआर्ट सेंटरमध्ये हे चित्रप्रदर्शन 20 डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये पराग बोरसे यांचे शोल्डरिंग द लव हे व्यक्तीचित्रण मांडण्यात आले आहे. शेळीच्या पिल्लाला आपल्या मुलाबाळांप्रमाणे खांद्यावर खेळवणार्या एका वृद्ध धनगराचे हे चित्र आहे. या माणसाच्या चेहर्यावरील स्मितहास्य आणि डोळ्यामधील वात्सल्यपूर्ण भाव हे या चित्राचे वैशिष्ट्य आहे. बोरसे यांच्या याच चित्राला यापूर्वीही पेस्टल जरनल अमेरिका या मॅगझीनने व्यक्तिचित्रणासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच या वर्षीच्या लोकसत्ताच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर येण्याचा मानही या चित्राने मिळवला आहे. जगाच्या बाजारपेठेवर कब्जा करणार्या चीनला पराग बोरसे यांचे चित्र आयात करावे लागल्याने बोरसे यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.