उरण : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात संचार बंदीसह 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र अत्यावश्यक सेवा वस्तू भाजी विक्रेत्यांना दुपारी 12 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली असताना उरण शहरात खेळाचे असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे लावण्यात आलेल्या भाजी फळ विक्रेत्याकडून सोशल डिस्टनचा वापर केला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांकडून सोशल डिस्टन्स पाळावा असा सुज्ञ नागरिकांमधून सूर व्यक्त केला जात आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये त्यांनी सोशल डिस्टन वापरले जावे, यासाठी उरण शहरात नगरपालिकेने भाजी आणि फळ विक्रेत्यासाठी नगरपालिका हद्दीतील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळेचे मैदान, एनआय हायस्कुलचे मैदान, सेंटमेरी हायस्कुलचे मैदान तसेच लाल मैदान असे चार ठिकाणे निश्चित करून तेथे भाजी आणि फळे विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली होती. मात्र सर्व फळे आणि भाजी विक्रेत्यांनी शहरातील लाल मैदानातच आपली दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील आणि इतर परिसरातील लोकांनी एकाच ठिकाणी खरेदी करण्यासाठी आल्याने मोठी गर्दी ही होत आहे. तसेच सोशल डिस्टन्सचा वापर ही केला जात नसल्याचे चित्र दिसत आहे. नगरपालिकेने वेगवेगळ्या परिसरात नियोजित ठिकाणी जर भाजी फळे विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली तर त्या परिसरातील लोकांना त्याच परिसरात भाजी खरेदी करता येईल आणि गर्दी कमी होऊन सोशल डिस्टन्सचा वापर होईल.
चार ठिकाणे भाजी विक्रीसाठी केंद्रित केली आहेत. सध्या एकाच ठिकाणी भाजी विक्री होत आहे, जर कोणी शेतकरी भाजी विक्री करण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांना तिथे बसण्यास देत आहोत जेणेकरून गर्दी होणार नाही तसेच बोरी नाक्यावरही जागा उपलब्ध करून दिली आहे, तिथेही भाजी विक्री साठी बसू शकतात.
-अवधूत तावडे, मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद