Breaking News

रायगडात तीन दिवस बार परमिट रूम राहणार बंद; निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्हयातील सहा नगर पंचायतींच्या सार्वत्रिक तसेच काही ग्रामपंचातीच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान होत आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 20 , 21 व 22 डिसेंबर असे तीन दिवस मद्यविक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी दारूची दुकाने तसेच बार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. हे आदेश ज्या क्षेत्रात निवडणूक आहे त्या क्षेत्रापुरते मर्यादीत आहेत. जिल्हयातील खालापूर, म्हसळा, तळा, पोलादपूर, माणगाव आणि पाली या 6 नगर पंचायतींच्या निवडणूकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यात 81 जागांसाठी मतदान होणार असून 237 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्याचबरोबर 179 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत आहेत. दोन्ही निवडणूकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होत असून 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या सर्वच निवडणूका चुरशीच्या होत असून शिवसेना, भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सारेच प्रमुख पक्ष सर्व ताकदीनि शी निवडण्णूकींच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानाला जेमतेम आठवडा उरला असल्याने प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार वेगवेगळया क्लुप्त्या वापरत आहेत. या दिवसात मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू , बियर चे आमीष दाखवले जात असते. त्यातून गैरप्रकार घडत असतात. हे लक्षात घेवून कोणताही गैरप्रकार होवू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत उपाययोजना केल्या जात आहेत.  यातलाच एक भाग म्हणून मतदानाच्या आदल्या दिवशी , मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 20, 21 व 22 डिसेंबर रोजी दारूविक्री बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र  कल्याणकर यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या परवानाधारकांविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल, असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी  दिले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply