Breaking News

सातारा येथील कॉलेजमध्ये साकारले लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृह; डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सभागृह उभारण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 17) मोठ्या उत्साहात झाले. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे सल्लागार अ‍ॅड. दिलावर मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर सभागृहाचे उद्घाटन करून ते कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी समर्पित करण्यात आले. या सोहळ्यास संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुजाता पवार आणि रयत सेवक उपस्थित होते. या वेळी दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शंभरातून एखादाच शूरवीर मनुष्य जन्मतो. हजारातून एखादाच विद्वान मनुष्य, दहा हजारांतून एखादा उत्कृष्ट वक्ता जन्मतो, परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच पाहायला मिळतो. असेच एक दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने लाभले आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक वारसा घेऊन ते काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सतत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. संस्थेच्या जबाबदारीचे कर्तव्य भावनेत रूपांतर करून त्यांनी या संस्थेच्या पनवेल, नवी मुंबई, रायगड आणि राज्यातील इतर अनेक शाखा सोयीसुविधायुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. आपल्या सेवाभावी वृत्तीचे सदोदित दर्शन घडवत रयतेचे शैक्षणिक काम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचे काम आहे, असे समजून सदैव त्यात झोकून देऊन शैक्षणिक प्रगतीची दारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्वांना खुली केली. मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना कमवा आणि शिका या योजनेत त्यांना मिळाले होते. त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाही. समाजसेवकाच्या भूमिकेतून रयतेच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये सभागृह उभारण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजाप्रती कार्य अफाट आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विकासाच्या उपक्रमात त्यांचा नेहमीच हातभार असतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन साकारले आहे. लवकरच या भवनाचे लोकार्पण होणार आहे.

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply