नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वृत्तानुसार आयपीएल 2022चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकार्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे. या वेळी 10 संघ लिलावात सहभागी होतील.
यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या नव्या दोन संघांचा समावेश आहे. अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी आयपीएल लिलावादरम्यान बोली लावली जाऊ शकते.
दरम्यान, लखनऊ आणि अहमदाबादसाठी 1 डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी 33 कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी तीन खेळाडूंना कायम ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे 15 कोटी, 11 कोटी आणि सात कोटींचे शुल्क आकारू शकतात तसेच तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.
‘क्रिकबझ’च्या बातमीनुसार आयपीएल 2022चा हंगाम 2 एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. या वेळी सामने वाढल्यामुळे ही लीग 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालू शकते.