पनवेल : वार्ताहर
अॅल्युमिनियम विक्रीच्या व्यवहारातील जमा केलेली 25 लाख 32 हजारांची रोख रक्कम मोटारसायकलवरून नवी मुंबईत घेऊन जाणार्या दोन कर्मचार्यांना पोलीस असल्याचे भासवून लुटणार्या टोळीतील सहा आरोपींना गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. या गुन्ह्यातील 15 लाख 18 हजारांची रोख रक्कम व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट व स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. एपीएमसी मार्केटमधील अॅल्युमिनियमच्या व्यापार्याकडे कामाला असलेले दोन कर्मचारी गेल्या 12 नोव्हेंबर रोजी रात्री अॅल्युमिनियम विक्रीच्या व्यवहारातील 25 लाख 32 हजारांची रोख रक्कम घेऊन मोटारसायकलने मुंबईतून ऐरोलीमार्गे नवी मुंबईत येत होते. या वेळी बुलेट मोटारसायकलवरून दोघा लुटारूंनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर या लुटारूंनी पोलीस असल्याचे भासवून दोघा कर्मचार्यांना ऐरोलीत अडवून रोख रकमेच्या बॅगेसह एका कर्मचार्याला जबरदस्तीने आपल्या बुलेटवर बसवून त्याला पूर्व द्रुतगती मार्गावर कांजूरमार्ग येथे नेलेे. त्यानंतर या कर्मचार्याला मारहाण करून बॅग लुटून पलायन केले होते. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू तडवी, निलेश पाटील व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून 24 तासांच्या आत या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले. मुंबईतील मालाड, कुरार, पठाणवाडी या भागातून सुनीलकुमार रूपनारायण यादव (36), पलटू ऊर्फ बंगाली परेशचंद्र प्रधान (49), अफजल कादीर कन्नाड (39), ज्ञानेंद्रकुमार विष्णूनारायण गुप्ता ऊर्फ गुड्डू (47) व शफीभाई ऊर्फ जाड्या ऊर्फ शफीक मोहम्मद इकबाल शेख (49) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इम्रान इस्माईल सिदातर ऊर्फ इम्रान घाची ऊर्फ श्यामभाई (43) हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर त्यालादेखील मालाड येथून अटक केली, तसेच आरोपींकडून 15 लाख 18 हजारांची रोख रक्कम, स्वीफ्ट डिझायर कार व एक बुलेट हस्तगत केली.