Breaking News

महाडमध्ये पाणी शिरले, मुरूडमध्येही कोसळधार

महाड : प्रतिनिधी

पंधरा दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर गणेशोत्सवाच्या आगमनाबरोबर महाड तालुक्यांमध्ये पावसाचा जोर गेल्या चार दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या तीन प्रमुख नद्यांतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरातील सखल भागांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सोमवारी गणेशभक्तांना श्रीगणेशाची स्थापना पावसातच करावी लागली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम सुरू असल्याने गणपती उत्सवानिमित्ताने आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले.सतत दोन दिवस पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढून सावित्री नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली.

महाड शहरातील मच्छीमार्केटसह दस्तुरी नाका, गांधारी पूल या भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले, तर तालुक्यातील वाळण, वाघेरी, कावले, बावले, मांघरुण या परिसरासह किल्ले रायगडच्या पायथ्याशी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने गांधारी नदीला पूर आला. त्याचबरोबर महाबळेश्वरसह आंबेनळी घाटांमध्येदेखील पावसाचा जोर कायम होता.

महाड शहरामध्ये सकाळी पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सात वाजता मच्छीमार्केट परिसरात पाणी शिरल्यानंतर दुकानदारांनी आपला माल सुरक्षित जागेत हलविण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील अन्य दुकानदारांनीही सामान सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. 6 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरामध्ये शहरातील अनेक व्यापार्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. बुधवारी पुन्हा  पुराचे पाणी शहरात शिरल्याने नागरिकांसह व्यापारी धास्तावले होते. दुसरीकडे ऐन गणपती सणामध्ये पुराचे पाणी गावांमध्ये आल्याने ग्रामीण ग्राहकांनी पाठ फिरवली होती. त्यात पुराचे पाणी आल्याने या वर्षी गणेशोत्सवानिमित्त दुकानांमध्ये आणलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

तालुक्याच्या सखल भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेक गावांना जोडणार्‍या रस्त्यावर पुराचे पाणी येऊन गावांचा संपर्क तुटला होता. नाते, कोळोसे, तेटघर या भागांमध्ये पाण्याच्या पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे कोझर, पाचाड, किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. खाडी विभागातदेखील अनेक गावांशी संपर्क तुटला. नागेश्वरी नदीवरील रावढळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचबरोबर रेवतळे गावाजवळ असलेल्या नदीवरील पूलही पुराच्या पाण्याखाली गेल्याने दापोलीकडे जाणारी वाहने थांबविण्यात आली. महाड तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांत 91 मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण 3735 मिमी पावसाची नोंद झाली असल्याचे नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले. दरम्यान, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली होती.

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसात असून, फक्त एका दिवसात 185 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी साचले होते.

मुरूड शहरात बाजारपेठ, आझाद चौक, अंजुमन हायस्कूल, गोलबंगला व अन्य ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालेे. गणपती उत्सवानिमित्ताने ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक खरेदी करण्यासाठी बाजारात आले असता, मुसळधार पावसाने ते गावात जाण्यासाठी अडकून पडले होते. पाऊस सारखाच पडत असल्याने पाणी निचरा न झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते.शेतामधील पाणीसुद्धा कमी न होता ते वाढतच चालेले आहे. आंबोली धरण दुथडी भरून वाहत आहे. हे धरण ओव्हरफ्लो झाले असून, त्यामधून पाण्याचा विसर्ग होत आहे.

याबाबत मुरूडचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तालुक्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. सर्वांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. भालगाव मार्गावर एक वृक्ष उन्मळून पडला होता. तोसुद्धा बाजूला हटवण्यात येऊन वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

यंदाच्या या पावसात मुरूड शहरात सर्वच ठिकाणी पाणी साचल्याने मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले की, या वर्षी शहरातील गटारांची खोदाई बरोबर झालेली नाही. बाजारपेठ भागात तर गटारांची खोदाईच झाली नाही. गटार खोदाईचा दरवर्षी लाखो रुपयांचा ठेका काढला जातो, परंतु गटारांची खोदाईच व्यवस्थित केली जात नाही. दिवसेंदिवस पाणी गटारातच राहिल्याने डासांची पैदास होऊन लोक आजारी पडतात. गटारातील पाणी वाहून गेले पाहिजे, परंतु असे होत नाही. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्याचे व्हिडीओ चित्रीकरण मुख्याधिकारी अमित पंडित व आरोग्य निरीक्षक राकेश पाटील यांना पाठवले असूनसुद्धा त्यांच्याकडून पाणी जाण्यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्याची खंतही फकजी यांनी या वेळी व्यक्त केली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply