- 10 तारखेच्या आत वेतन देण्याचे परिवहनमंत्र्यांकडून आश्वासन
- निधीच्या पूर्ततेनंतर वैद्यकीय देयकेही देणार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील एसटी कामगारांचा संप दीर्घकाळ चालला असून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपकर्यांना पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर सध्या मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एसटी कर्मचार्यांच्या हितासाठी प्रश्न मांडून त्यांना वेळेवर वेतन व वैद्यकीय देयके मिळण्यासाठी आवाज उठवला.
सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी कमर्चार्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. विलनीकरणाच्या मुद्द्यावर संप दीर्घकाळ चालला आहे. त्याच्यापाठी प्रमुख मागण्या पगारवाढ, त्याचबरोबर वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्ती होती. या संदर्भात सरकारकडून निधी उपलब्ध होईल तसा अदा केले जाईल असे उत्तर देण्यात आले आहे. वेतनवाढ ठराविक कालावधीनंतर सातत्याने झालीच पाहिजे, शिवाय वैद्यकीय बिलांची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून स्थायी स्वरूपाची व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी करतानाच कर्मचार्यांची एसटीचे विलनीकरणाची मागणी ठाम आहे. या संदर्भात शासन काय करणार आहे, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला. परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचार्यांना 10 तारखेच्या वेतन देण्याचे आश्वासन देऊन निधीची पूर्तता होताच वैद्यकीय बिलांचा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
सभागृहात उत्तर देताना मंत्री परब यांनी सांगितले की, एसटी कर्मचार्यांचे वेतन नियमित होत नव्हते. आता राज्य शासनाने 10 तारखेच्या आत वेतन देण्याची जबाबदारी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांत एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. 12 हजार कोटींचा संचित तोटा असताना या वर्षी संपामुळे 650 कोटींचे नुकसान झाले. कराराचा भाग आम्ही पूर्ण केला असून वैद्यकीय बिलांबाबत निधीची मागणी झाली आहे. तिची पूर्तता झाल्यावर ताबडतोब बिलांचा विषय प्राथमिकतेने घेतला जाईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper