पनवेल : वार्ताहर
राज्यभर ओमायक्रॉन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणार्यांकडून साडेतेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, मॉल्स, गर्दीची ठिकाणे येथे विनामास्क फिरणार्या नागरिकांना 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे, तसेच प्रत्येक विभागात, मॅरेज हॉल्स, बँक्वेट हॉल, सोसायट्या यांच्यावरही पालिकचे लक्ष असणार आहे. 31 डिसेंबरला नववर्षानिमित्त कोणतेही कार्यक्रम करण्याआधी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक दिसून आल्यास अशा आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले आहे, तसेच प्रवास करणार्या प्रवाशांकडे ट्रॅव्हल पास असणे बंधनकारक असणार आहे. पालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्समध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आले आहे, तसेच त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात किती जागा आहेत व त्यांच्या 50 टक्के किती जागा भराव्यात, हॉटेलमध्ये येणार्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले असावे, मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे.
रात्रीची जमावबंदी पालिकेने घोषित केली असल्याने रात्री 9:00 ते सकाळी 6:00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत, अशा सूचनांचे स्टिकर्स हॉटेल्सच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत. या सूचनांचे उल्लंघन हॉटेलमालकांनी केल्यास अशा हॉटेल्सवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले आहेत. विनामास्क फिरणारांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी कोरानाच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका