समस्या तातडीने सोडविण्याचे तहसीलदारांचे निर्देश
उरण : प्रतिनिधी
वाहतूक कोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसीलदारांची विविध अधिकार्यांसोबत बैठक घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. उरण तालुक्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात.
या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक अपघात होतात. त्यावर कडक उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याबाबत उरणचे तहसीलदार उरण तालुक्यातील वाहतूक पोलिसांना सूचना देऊन रस्त्यावरची पार्किंग बंद करण्यासाठी उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीत एनएमएमटी सेवा, सिडको कार्यालयाजवळील कमकुवत पुलावर हाईट बॅरिकेट लावणे इत्यादी उरणच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरणचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील पाटील, उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक अशोक गायकवाड, न्हावाशेवा वाहतूक विभागाचे पोलीस निरिक्षक निरज चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार आदी उपस्थित होते.