Breaking News

सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार; आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा तारांकित प्रश्न

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे व नव्याने विकसित होणार्‍या गृहप्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची भीती आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधिमंडळाच्या मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात व्यक्त केली आहे. तसेच या संदर्भात योग्य ती उपाययोजना करा, अशी मागणीही केली आहे. पनवेल तालुक्यातील सिडको व नैना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत, तसेच सर्वसामान्यांना परवडणार्‍या मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असणार्‍या गृहनिर्माण प्रकल्पाला तातडीने मूलभूत सुविधा, नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जुलै 2021मध्ये वा त्यादरम्यान उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको लि., नवी मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सिडको विकसित खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील काही विभागांत अत्यंत अनियमित पाणीपुरवठा होत असून नागरिकांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे, तसेच नव्याने विकसित होणार्‍या गृहप्रकल्पामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः सिडकोने विकसित केलेल्या कामोठे येथील वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची क्षमता 42 एमएलडी इतकी असून मागील दोन महिन्यांपासून 20 ते 25 एमएलडी इतकाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. सिडकोमार्फत नव्याने विकसित होणार्‍या मोठ्या प्रमाणातील गृहप्रकल्पांना पाणीपुरवठ्याची वेळीच उपायायोजना न झाल्यास भविष्यात असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण होणार असून या प्रकरणी शासनाने चौकशी करून सिडको हद्दीतील गृहप्रकल्प, नव्याने निर्माण होणार्‍या गृहप्रकल्पांना, तसेच कामोठे येथील वसाहतींना पाणीपुरवठा होण्याबाबत कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी दाखल केला होता. या संदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी स्वरूपात दिलेल्या उत्तरात सांगितले की, सिडकोमार्फत संबंधित विभागांना-नोड्सला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीचे बारवी, पाताळगंगा स्रोत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मोरबे प्रकल्प, तसेच न्हावा शेवा टप्पा-1 अंतर्गत भाग भांडवल देऊन वेळोवेळी पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. नव्याने विकसित होणार्‍या गृहप्रकल्पांसाठी व नैना अंतर्गत राबविण्यात येणार्‍या वसाहतीसाठी सन 2050पर्यंत लागणार्‍या पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने हेटवणे पाणीपुरवठा योजना (270 द.श.लि.), बाळगंगा पाणीपुरवठा योजना (350 द.श.लि.), कोंढाणे पाणीपुरवठा योजना (250 द.श.लि.), मोरबे पाणीपुरवठा योजना (250 द.श.लि.) व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण न्हावा शेवा टप्पा 1 ते 3 योजनेमधून (154 द.श.लि.) असे एकूण 1114 द.श.लि. पाणीपुरवठ्याचे नियोजन आहे. भविष्यात गृहनिर्माण प्रकल्पामधून निर्माण होणार्‍या सांडपाण्याच्या प्रक्रियेचा व पाणी पुनर्वापर प्रक्रियेचा समावेश नियोजनामध्ये केलेला आहे. पाणीपुरवठा योग्य दाबाने करण्यासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स (टीसीई)ची नियुक्ती केली असून त्यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा समतोल करण्यात आला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply