Breaking News

कोरोनाविरुद्ध जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना

31 डिसेंबर व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता

अलिबाग : जिमाका

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू झाली आहे. मात्र ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या वाढत्या प्रादूर्भावास रोखणे, हेदेखील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाकडून विविध स्तरांवर अहोरात्र अथक प्रयत्न सुरू आहेत.

प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्या स्तरावर त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक, पर्यटन क्षेत्राशी संबंधित इतर घटक यांच्या बैठका घेण्यात येत असून, सर्वांना कोविड अनुरूप वर्तनाविषयी सविस्तर माहिती देण्यात येत आहे. नागरिकांना विविध माध्यमांमधून मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण करून घेणे याविषयी सातत्याने आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर येणार्‍या पर्यटकांची थर्मल स्कॅनरने तपासणी, त्यांनी लसीकरण केले आहे किंवा कसे, याबाबतची विविध तपासणी नाक्यांवर चौकशी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांविषयीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. आरोग्य विभाग व  नगरपालिकांच्या फिरत्या वाहनांवरील लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना काळजी घेण्याचे तसेच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याविषयी आवाहन केले जात आहे.

स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी जिमखाना, क्लब, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, दुकाने, धार्मिक स्थळे, कोचिंग क्लासेस, खाजगी कार्यालये, सार्वजनिक स्थळे इत्यादी ठिकाणी भेट देत असून ज्या ठिकाणी नागरिक विनामास्क आढळत आहेत, त्यांच्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांनी तसेच रायगड जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांनी नववर्षाचे स्वागत उत्साहाने जरूर करावे, मात्र सर्वांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या काळजीसाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे, लसीकरण करून घेणे या कोविड प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालनही करावे.

-डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply