फ्रंटलाइन वर्कर्सना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस
अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यात सोमवार (दि. 3) पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. रायगड जिल्ह्यातील 94.39 टक्के लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतला असून, यापैकी 67.94 टक्के लाभार्थ्यांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. मात्र सध्या जगात वाढत असलेले कोविड रुग्ण व आढळून येत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण वाढविण्याचे निर्देश दिले असून, 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासोबत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांच्यासह 60 वर्षांवरील व्याधिग्रस्त नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली.
सोमवारपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु करावे व त्यांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करावा. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाइन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना 10 जानेवारी 2022पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देताना संबंधित लाभार्थ्याने दुसरा डोसच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असावे. 60 वर्षे वा वरील सहव्याधी असलेल्या व्यक्तिंना त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या सल्ल्याने 10 जानेवारी 2022 पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.