Breaking News

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या!

आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

कळंबोली : प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचा त्याला कडाडून विरोध होताना दिसत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे झुंजार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देणे उचित ठरेल, अशी आग्रही भूमिका पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नवी मुंबई विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे येथील स्थानिकांमधून शिंदेंविरोधात नाराजीचा सूर उमटला असून, या विमानतळाच्या नावावर लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचा हक्क असल्याची मते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. त्यातच आता पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आपली भूमिका स्पष्ट करून ‘दि. बा’ यांचेच नाव येथील विमानतळाला देणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी पनवेल, उरणमधील छोट्या-मोठ्या गावांच्या जमिनी घेण्यात आलेल्या आहेत. स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी स्व. दि. बा. पाटील यांनी वेळोवेळी दिलेले योगदान येथील आजी-माजी आमदार, खासदार, सरपंच, नगरसेवक अगदी तळागाळातील लोकांना माहीत असल्याने ‘दि बा’ यांचे कार्य काय आहे हे कोणालाही वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या परिसरात साकारत असलेल्या विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याबाबत कुणाचे दुमत नसेल.
स्थानिकांच्या हृदयातील प्रकल्पग्रस्तांचे नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी कोणताही विरोध नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे दाखवतील असे वाटत नाही. येथील प्रकल्पग्रस्त व सर्व राजकीय मंडळींच्या मनात असलेले ‘दि. बा.’ यांचेच नाव या विमानतळाला दिले जाईल, असा विश्वासही आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply