पनवेल ः प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षांवरील मुलांचे नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून यासाठी पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथके तयार केली असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालकांना केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 वर्षांवरील (15 ते 18 वयोगट) मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केल्याने पनवेल महापालिका हद्दीत लस देण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महापौर कविता चौतमोल यांनी गुरुवारी आपल्या दालनात बैठक बोलावली होती. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग सभापती समीर ठाकूर, अनिता पाटील, सुशीला घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका रूचिता लोंढे, नेत्रा पाटील, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. मुजावर उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीत मुलांच्या लसीकरणासाठी उपाययोजना करण्याबाबत सांगितले असल्याने आजची बैठक बोलवल्याचे सांगून महापौर डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, कोरोना पुन्हा वाढू लागला असल्याने महापालिकेतर्फे नवीन वर्षाच्या प्रारंभी 3 जानेवारीपासून इयत्ता आठवी ते बारावीतील मुलांना (सन 2007 पासून जन्म झालेल्या) शाळेमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी त्यांना लस देण्याकरिता शाळेला परवानगी द्यावी.
उपायुक्तांनी सांगितले की, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने 10 पथके तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात एक डॉक्टर असणार आहे. याशिवाय एक रुग्णवाहिका असेल. दररोज 10 शाळांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यांच्या पालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी. शाळा बंद झाल्यास जवळच्या शाळेत लस उपलब्ध करून देण्यात येईल.
पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षांवरील मुलांचे कोरोना लसीकरण 3 जानेवारीपासून करण्यात येतेय हा चांगला निर्णय आहे. शाळेतील मुलांच्या बाबतीत अनेक पालक सेन्सेटीव्ह असतात. त्यामुळे या लसीकरणाला विरोध होऊ शकतो. म्हणून मुलांची जबाबदारी शाळांनी घेऊन लसीकरणासाठी पालकांची संमती घ्यावी किंवा त्यांना ऑनलाइन नोंदणी करायला सांगावे. -परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका