प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज
अलिबाग : प्रतिनिधी
31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजीच्या नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेस फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. बेकायदा पाटर्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून नियमांचा भंग करणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
अलिकडच्या काळात गोव्यापाठोपाठ रायगडातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, माथेरान ही पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी फेव्हरेट डेस्टिनेशन बनली आहेत. नाताळचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. आता थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन आणि नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे विशेषत: समुद्रकिनारे सध्या गजबजले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्तक झालेली आहे.
शासनाने 31 डिसेंबर व 1 जानेवारीसाठी नियमावली जारी केली आहे. प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात आहे. पोलिसांनीही पर्यटन व्यावसायिक, हॉटेल, लॉजेस, कॉटेज मालकांच्या बैठका घेऊन सूचना केल्या आहेत. याशिवाय ठिकठिकाणी पोलीस पथके तैनात असतील.